दादरी प्रकरण आणि ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या या दोन्ही घटना भाजपचे सरकार असलेल्या राज्यात घडलेल्या नाहीत, असे सांगत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी या प्रकरणी केंद्र सरकारवर होत असलेले आरोप फेटाळले. कायदा आणि सुव्यवस्था राज्य सरकारच्या अखत्यारितीत येते. त्यामुळे या विषयावरून भाजपवर टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दादरी प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये घडले, तिथे समाजवादी पक्षाचे सरकार आहे आणि कलबुर्गी यांची हत्या कर्नाटकात झाली. तिथे काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करणे योग्य नाही. कायदा व सुव्यवस्था हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे या घटनांवर राज्य सरकारनेच स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरी प्रकरण दुःखद असल्याचे म्हटले होते. मात्र, यामध्ये केंद्र सरकार दोषी कसे काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनीही या घटनांशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.