शहाजहानपूर : उन्नाव येथील बलात्कार पीडित मुलीने शुक्रवारी पोलिस संरक्षणात बरेली विद्यापीठातील एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांनी लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप तिने केला होता.

चिन्मयानंद यांचा संबंध नसलेल्या संस्थेत या मुलीला कायदा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश देण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आधी म्हटले होते. पीडित मुलीवर खंडणीचे आरोप असल्याने तीही तुरुंगात आहे. तुरुंगाधिकारी राजेश कुमार राय यांनी सांगितले, की तिला महाविद्यालयीन प्रवेशासाठी  सकाळी सात वाजता  तुरुंगातून बाहेर नेण्यात आले.

या मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी नऊ वाजता पोलिस संरक्षणात या संस्थेमध्ये आणले गेले. त्या वेळी तिने शुल्क भरून प्रवेश घेतला, यात परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क, वाचनालय शुल्कही समाविष्ट आहे. तिने प्रवेश घेतल्याची माहिती महात्मा जोतिबा फुले रोहिलखंड विद्यापीठाचे प्रमुख अमित सिंह यांनी दिली.

या विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य रवी भटनागर यांनी सांगितले, की या मुलीच्या भावाचे शुल्क आधीच भरण्यात आले होते. शुक्रवारी त्याला रीतसर प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर प्रवेश देण्यात आला. मुलीच्या वडिलांनी यासाठी महाविद्यालयात अर्ज केला होता.