करोना व्हायरस, दक्षिण चीन महासागर आणि हाँगकाँगसारख्या प्रकरणावरून चीन सध्ये सर्वच देशांच्या निशाण्यावर आहे. तर दुसरीकडे लडाखजवळ असलेल्या भारत चीन या दोन्ही देशांच्या सीमेवरूनही चीनच्या कुरापती सुरू आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेसमवेत ८ देशांनी चीनची उपस्थिती ही जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांसाठी धोकादायक असल्याचं सांगत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आठ देशांनी मिळून ‘इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑफ चायना’ची (IPAC) स्थापना केली आहे. तर दुसरीकडे इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑफ चायना (IPAC) हे बनावट असल्याचं चीनमध्ये म्हटलं जात आहे.

शुक्रवारी इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाची (IPAC) स्थापना करण्यात आल्याचं ब्लूमबर्गच्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि यूरोपच्या संसदेचे सदस्य सहभागी आहेत. चीनवर टीका करणारे आणि अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर मार्को रुबियो इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाचे सह-अध्यक्ष आहेत.

कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत चीन जागतिक आव्हान उभे करत असल्याचे रुबिओ यांनी म्हटलं आहे. चीनच्या विरोधात उभं राहणाऱ्या देशाला कायम असं एकट्यानं करावं लागतं आणि त्याची मोठी किंमतही फेडावी लागते, असं इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाचं म्हणणं आहे. करोना व्हायरसच्या प्रसारानंतर चीन आणि अमेरिकेतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच त्याचा परिणाम व्यापार आणि पर्यटनाच्या संबंधांवरही दिसू लागला आहे.

१९०० च्या दशकातला चीन नाही
चीनमध्ये या निर्णयाची तुलना १९०० च्या दशकातील ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इटली आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या ८ नेशन अलायन्सशी केली जात आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सनुसार या देशांच्या सैन्यानं पेईचिंग आणि अन्य शहरांमध्ये लूटमार केली होती आणि साम्राज्यवादाविरोधात यिहेतुआन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.

सध्याचा चीन हा १९०० च्या दशकातील चीन राहिलेला नाही. तसंच तो आपल्या हितांच रक्षणही करू शकतो, असं पेईचिंगमधील चाइन फॉरेन अफेअर्स विद्यापीठातील तज्ज्ञ ली हाएडॉन्ग यांनी म्हटलं आहे. अमेरिका अन्य देशांना चीन विरोधी विचारसरणीत सामावून घेत आणि पश्चिमेकडील क्षेत्रात चीनविरोधात वातावरण तयार करून स्वत:चा फायदा करून घेऊ इच्छित आहे, असंही ली म्हणाले.