राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पक्षाध्यक्ष शरद पवार व मुंबईस्थित ज्येष्ठ वकील माजीद मेमन उमेदवारी दाखल करणार असल्याचे पक्ष प्रवक्ते प्रा. डी.पी. त्रिपाठी यांनी दिल्लीत सांगितले. उभय नेते २४ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनावर ‘आप’ राजकीय पक्ष नसून देशाला मिळालेला शाप आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्रिपाठी म्हणाले की, आपने नैतिकतेचा बुरखा पांघरला आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारे केजरीवाल  स्वतला सम्राट समजू लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद म्हणजे निवडलेला वेडेपणा (सिलेक्टेड मॅडनेस) तर पंतप्रधानपदाचे स्वप्न म्हणजे कायमस्वरूपी वेडेपणा (परमनंट मॅडनेस)आहे. पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय म्हणजे जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया मूर्खपणाचा कळस आहे अशी टीका केली.

राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास त्यांच्या हाताखाली काम करण्यास शरद पवार राजी नाहीत. त्यामुळे राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला का, असा प्रश्न विचारला असता त्रिपाठी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने अद्याप कुणाची उमेदवारी घोषित केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही.

सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी होईस्तोवर शशी थरूर यांनी मंत्रिपदाच्या जबाबदारीपासून दूर रहावे, असे त्रिपाठी म्हणाले. मात्र त्यासाठी थरूर यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.