संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत

काही व्यक्ती वा गटांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करावा आणि कलावंतांना नामोहरम करावे असे वाटते, त्यात प्रसंगी सरकारही सामील होते वा मूक साक्षीदार होते. कारण सरकारलाही प्रगत, निर्भीड विचार नको असतात. अशा विचारांची भीती सरकारला वाटते. कारण विचार क्रांती घडवून शासनव्यवस्था बदलू शकतात. म्हणून ‘राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस’ असे अध्यक्षीय भाषणातून सरकारला सांगावे लागले, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शनिवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. हे विधान म्हणजे समाजातील सध्याचे वास्तव आहे, असेही ते म्हणाले.

संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून देशमुख यांनी सरकारला कारभाराबाबत थेट बोल सुनावत समाजातील विविध प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेतली. आज सकाळपासून राज्याच्या विविध भागांतून या भूमिकेबद्दल अभिनंदन करणारे दूरध्वनी त्यांना येत होते. प्रत्येकाच्या अभिनंदनाचा नम्रपणे स्वीकार करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जुन्या-कालबाह्य़ धर्मश्रद्धा-परंपरांना छेद देऊ  शकतात. त्यामुळे सरकारला व्यवस्थेवर बंडखोर भाष्य करणारे साहित्यिक-कलावंत नको असतात. पण भारताने लोकशाही तत्त्व स्वीकारले आहे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार म्हणून संविधानाने बहाल केला आहे. म्हणून दुसऱ्याचा विचार पटला नाही तरी त्याचा आदर करणे हा लोकशाहीचा आत्मा आहे हे ध्यानात ठेवलेच पाहिजे, असे देशमुख म्हणाले. ‘मी कदाचित तू जे म्हणतोस त्याच्याशी सहमत होऊ  शकत नाही. पण तुझ्या म्हणण्याच्या अधिकाराचे, मी मृत्यू आला तरी रक्षण करेन’ हे व्होल्टेअरचे सुभाषित सांगून तुम्ही या अर्थाने लोकशाहीचे तत्त्व पाळत नाही आहात ही बाब मला स्पष्टपणे सरकारला सांगायची आहे, अशा शब्दांत देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली.

अध्यक्षीय भाषणात मांडलेले मुद्दे आणि संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात येणारे ठराव याबाबत सरकारशी संवाद करण्यावर माझा भर असेल, असे देशमुख यांनी सांगितले. मी अनेक वर्षे प्रशासनात काम केले आहे.

सरकारची काम करण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. त्या चौकटीबाहेर जाऊ न इच्छा असली तरी सरकार काही करू शकत नाही. त्यामुळे सरकारशी संवाद साधून काम करण्यावर भर राहणार आहे, असेही ते म्हणाले.

संमेलनाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाबद्दलचा मुद्दा साहित्य महामंडळाच्या अखत्यारीतला आहे. पण नंतर माजी अध्यक्ष म्हणूनही काम करण्यासाठी कोणी रोखलेले नाही, याकडे लक्ष वेधताना देशमुख यांनी श्रीपाल सबनीस यांचा दाखला दिला.