खास नौदलासाठी बनवण्यात आलेल्या तेजसच्या सागरी आवृत्तीची संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने रात्रीच्या वेळी केलेली अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीमधून डीआरडीओने अरेस्ट लँडिंग हाताळण्याचे आपले कौशल्य दाखवून दिले आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या चाचणीचा व्हिडीओ डीआरडीओने पोस्ट केला आहे.

तेजस हे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे. १२ नोव्हेंबरला ६.४५ च्या सुमारास एसबीटीएफ गोव्यामध्ये एलसीए तेजसचे अरेस्ट लँडिंग करण्यात आले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही पहिली चाचणी आहे. अरेस्ट लँडिंगच्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल, डीआरडीओ आणि एचएएलचे कौतुक केले आहे.

दोन महिन्यापूर्वीच गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील नौदलाच्या तळावर घेण्यात आलेली एलसीए तेजसची अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली होती. ही चाचणी दिवसा घेण्यात आली होती. सर्वसामान्य तेजस विमानाला उड्डाण आणि लँडिंगसाठी एक किलोमीटरची धावपट्टी लागते. तेजसच्या सागरी आवृत्तीमध्ये उड्डाणाला २०० मीटर आणि लँडिंगसाठी १०० मीटरची धावपट्टी लागते.

अरेस्ट लँडिंगमध्ये धावपट्टीवरील वायरच्या मदतीने फायटर विमानाचे लँडिंग होते. त्यासाठी विमानाचा वेग कमी करावा लागतो. आता तेजसची लवकरच आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर अरेस्ट लँडिंगची चाचणी होईल. डीआरडीओ, एचएएल आणि सीएसआयआर या संस्था तेजसच्या सागरी आवृत्तीच्या विकासामध्ये सहभागी आहेत. एलसीए तेजसची सागरी आवृत्ती निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे. इंडियन एअर फोर्समध्ये तेजसचा आधीच समावेश झाला आहे. अगदी मोजक्या देशांकडे अरेस्ट लँडिंगची टेक्नॉलॉजी आहे.