शरद पवार, उद्धव ठाकरे यांचाही समावेश

करोना प्रतिबंधासाठी मोफत सामूहिक लसीकरण सुरू करावे, तसेच सेंट्रल व्हिस्टा सुधार प्रकल्प स्थगित करून तो पैसा महासाथीविरुद्धच्या लढ्यात वापरावा, असे आवाहन करणारे पत्र १२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

गरजूंना अन्नधान्य पुरवावे, तसेच बेरोजगारांना दरमहा ६ हजार रुपये द्यावे, अशीही मागणी काही मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या संयुक्त पत्रात केली आहे.

तीन केंद्रीय शेतीविषयक कायदे रद्द केल्यास लाखो अन्नदाते महासाथीचे बळी होण्यापासून वाचतील असे सांगून, हे कायदे रद्द करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.

या पत्रावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान व जद (से) चे नेते एच.डी. देवेगौडा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे (शिवसेना), ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), एम.के. स्टालिन (द्रमुक) व हेमंत सोरेन (जेएमएम) या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला (एनसी) व अखिलेश यादव (सप), तेजस्वी यादव (राजद), डी. राजा (भाकप) व सीताराम येचुरी (माकप) या नेत्यांच्याही पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.