चीन आणि भारत या दोन्ही देशांनी आपले सैन्य डोकलाममधून मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यामुळे हा तणाव निवळेल असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशीच ‘डोकलाम प्रकरणावरून धडा घ्या’ असे चीनने, भारताला सुनावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात चीन दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या काही दिवस आधीच चीन आणि भारत या दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे असले तरीही आता चीनने दिलेल्या नव्या इशाऱ्यामुळे हा संघर्ष येत्या काळातही सुरू राहू शकतो अशी शक्यता आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलाम प्रश्नावरून सुमारे ७० दिवस वाद सुरू होता. सोमवारी दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. अशात पुन्हा एकदा चीनने भारताला इशारा दिला आहे.  जून महिन्यात चीनच्या सैन्याने सिक्कीम या ठिकाणी असलेल्या डोकलाम या सीमाभागात घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्यदलानेही डोकलाममध्ये सैन्य उभे केले होते. आधी चीनने सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका भारताने घेतली होती, तर भारताने आधी सैन्य मागे घ्यावे अशी भूमिका चीनने घेतली होती.

भारताने सैन्य मागे घेतले नाही तर ‘युद्धाला तयार रहावे’, ‘१९६२ सारखी अवस्था करू’ असे इशारे देण्यात आले होते. या इशाऱ्यांना भारताने न घाबरता तसेच चोख प्रत्युतरही दिले. तसेच अत्यंत संयमी भूमिका घेऊन हा प्रश्न हाताळला. अशात या डोकलाम प्रकरणातून भारताने शिकायला हवे, सीमा प्रश्नाबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याचे अधिक काटेकोरपणे पालन करावे असेही चीनने म्हटले आहे.

डोकलाममधून चीनने बुलडोझर आणि रस्ते निर्मितीची साधने हटवली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनने वादग्रस्त भागात रस्ता निर्मितीचा निर्णय मागे घेतला आहे असेच त्यांच्या डोकलामच्या निर्णयावरून स्पष्ट होते आहे अशीही माहिती समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारी ब्रिक्स परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.