बंडखोर काँग्रेस आमदारांना जर पुन्हा काँग्रेसशी संवाद हवा असेल तर त्यांनी आधी हरयाणात त्यांना सुरक्षित ठिकाणी भाजपने दिलेले आदरातिथ्य सोडावे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी हरयाणा पोलिसांच्या सुरक्षेतून बाहेर पडावे असेही त्यांनी म्हटले आहे.

बंडखोरांसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, आमदारांना जर काँग्रेसशी पुन्हा संवाद करायचा असेल तर त्यांनी मनेसर येथे हरयाणा पोलिसांनी दिलेली सुरक्षा सोडावी, तसेच भाजपशी मैत्री व त्यांचे आदरातिथ्य सोडावे. गुरगावमध्ये सामूहिक बलात्कार होत आहेत, लोकांना मारहाण होत आहे,पण तेथे सुरक्षेसाठी हरयाणाचे पोलीस उपलब्ध नाहीत. मात्र, एक हजार पोलीस हे काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांना संरक्षण देण्यासाठी तैनात आहेत. आमदारांनी प्रथम हरयाणा पोलिसांच्या संरक्षणातून व तेथील भाजपच्या आदरातिथ्यातून बाहेर यावे.

राम मंदिर पायाभरणी समारंभाबाबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जारी केलेले निवेदन त्यांनी वाचून दाखवले. एका प्रश्नाच्या उत्तरात सूरजेवाला यांनी सांगितले की, राजकारणात धर्म असावा पण धर्माचे राजकारण करू नये. हॉटेल सूर्यगड  येथे काँग्रेसच्या आमदारांना ठेवले आहे तेथे ते बोलत होते.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा हस्तक्षेप चुकीचा

बिहार पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू  प्रकरणात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, कारण ती बाब महाराष्ट्र पोलिसांच्या अखत्यारीतील आहे. बिहार पोलिसांनी हस्तक्षेप केला तर ती अराजकासारखी गोष्ट आहे. कुठल्याही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्या राज्याची असते, असे अथिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते सूरजेवाला यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.