‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते,’ असे वाक्य सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले असते, पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. धुम्रपानाचा परिणाम केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही, तर तो मानसिक आरोग्यावरही होत असतो. जर धूम्रपान करणाऱ्या धूम्रपानास तिलांजली दिली तर त्याचे मानसिक आरोग्य सुधारते, असे मत वॉशिंग्टन विद्यापीठातील एका संशोधकाने व्यक्त केले आहे.
हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णाने जर धूम्रपान सोडले तर त्याचे फायदे त्याला लगेच मिळतात. त्याचे दैनंदिन जीवन सुधारते आणि त्याच्या मानसिक आरोग्यातही बऱ्यापैकी सुधारणा होतात.
धूम्रपान सोडल्यास महिनाभरात त्याचे मानसिक परिणाम तुम्हाला जाणवायला लागतात, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील औषधोत्पादन विभागचे सहाय्यक प्राधापक शेरॉन क्रेसी यांनी सांगितले.
धूम्रपान सातत्याने करणाऱ्याला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हृदयविकाराचा पहिला झटका येऊनही जो धूम्रपान सोडत नसेल तर त्याला दुसरा झटका येण्याची किंवा मृत्यू येण्याची भीती असते. पण हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर धूम्रपान कायमचे सोडून दिले तर दुसरा झटका येण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते.
रुग्णाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. दैनंदिन जीवनात त्याला प्रसन्न वाटते आणि विचारशीलतेलाही चालना मिळते, असे क्रेसी सांगतात.

*  क्रेसी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने ४००० रुग्णांचा अभ्यास केला आहे. ज्यामध्ये कधीच धूम्रपान न करणारे, धूम्रपान सोडणारे आणि सातत्याने धूम्रपान करणारे यांचा समावेश होता.
* सातत्याने धूम्रपान करणाऱ्या अनेक रुग्णांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही धुम्रपान सोडले नाही. त्याचा शारीरिक व मानसिक त्रास त्यांना झाला.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर धूम्रपान सोडणाऱ्यांना वैद्यकीय फायदा झाला. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. त्यांचे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत झाली.