मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेलं नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बैरूट हादरलं. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे.

नक्की पाहा >> उद्धवस्त झालेल्या इमारती, धुराचे लोट आणि आक्रोश; पाहा स्फोटांनंतरचे धक्कादायक फोटो

बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये स्थानिक लोकं मदतीसाठी वाट पाहतानाचे चित्र पहायला मिळालं. आधी मृतांचा आकडा ७० तर जखमींचा आकडा २७५० असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून ७० जणांचा मृत्यू झाला असून चार हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

बंदराजवळच्या भागात झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या मोठ्या परिसराचे नुसान झालं आहे. रेड क्रॉस, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या मोठ्या संघटनांनी तात्काळ मदत करण्याचे आवाहन केलं आहे. लेबनानमधील यंत्रणा आधीच करोना संसर्गाशी दोन हात करत असतानाच या स्फोटामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. या स्फोटांनंतर शहरामध्ये अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. या स्फोटांमधील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र काही वृत्तवाहिन्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागल्याने हे स्फोट झाले. तर या स्फोटांनंतर नारंगी रंगाचे ढग स्फोट झालेल्या प्रदेशाच्या वर दिसून आल्याने स्थानिक प्रसारमाध्यमांनी सोडियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र यावर अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

भारतीय दुतावास म्हणतं…

बैरुटमधल्या भारतीय दुतावासाने बैरुटमध्ये असलेल्या भारतीयांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाइन नंबर्सही देण्यात आले आहेत. दरम्यान बैरुटमधल्या या स्फोटाचे विविध व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.