चीनच्या कम्युनिस्ट पक्षात अनेक पातळ्यांवर आलेली सुस्ती, वाढत असलेली बेदिली याबाबत नवे नेते शी शिनपिंग यांनी झाडाझडती घेतली असून सहा दशकांपासून देशावर असलेली पक्षाची पकड ढिली होईल, असा इशारा देतानाच चीनच्या इतिहासातील भल्याभल्या राजवटींच्या उदय आणि अस्ताचे दाखलेही त्यांनी दिले आहेत.
चीनमध्ये आठ बिगरकम्युनिस्ट पक्षांना अधिकृत मान्यता आहे. त्यांच्या नेत्यांसह झालेल्या बैठकीत ते  बोलत होते. ते म्हणाले की, किडे वाढण्याआधीच गोष्टी सडायला सुरुवात झाली असली पाहिजे, अशी प्राचीन म्हण आहे. त्यापासून बोध घेऊन कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्त बाणवली पाहिजे आणि व्यवहारात शुचिता आणली पाहिजे.
भ्रष्टाचार आणि आत्मसंतुष्टता यामुळे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता लयाला जाईल, असा इशाराच जणू शी यांनी दिल्याने बिगरकम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. चीनमध्ये कित्येक राजवटी भ्रष्टाचाराने लयास गेल्या, याची जाणीवही बिगर कम्युनिस्ट नेत्यांनी १९४५ मध्ये माओंनाही करून दिली होती, याची आठवण यावेळी स्वत शी यांनीच करून दिली. ‘चायना डेमोक्रेटिक नॅशनल कन्स्ट्रक्शन असोसिएशन’ (चिनी लोकशाहीवादी राष्ट्रीय रचनासंस्था) या पक्षाचे संस्थापक हुआंग यांग्पेइ यांच्याशी माओ यांनी चर्चा केली होती. त्यावेळी वर्षांनुवर्षे सत्ता भोगून आलेल्या शैथिल्याने राजवटी कशा कोसळल्या, हे यांग्पेइ यांनी सांगितले होते. त्यामुळेच १९४९ मध्ये माओंनी चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा लोकांचा पक्ष बनविला.
लैंगिक गुन्हे, भ्रष्टाचार या आरोपांनी चीनचे काही नेते झाकोळले आहेत. मावळते अध्यक्ष वेन जिआबाव यांच्या कुटुंबियांनी दोन अब्ज डॉलरची मालमत्ता जमविल्याचाही आरोप आहे. शी यांच्यावरही असे आरोप झाले आहेत. सध्या चीनमधील भ्रष्टाचार आणि गरिबी-श्रीमंतीतील वाढती दरी यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत असल्यानेच शी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ाला हात घातला.