छोट्या पडद्यावरील अभिनेत्री लीना आचार्य यांचे शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. किडनी फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. गेल्या दिड वर्षांपासून त्या किडनीशी संबंधीत आजाराशी झुंज देत होत्या. काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच लीना यांच्या आईने त्यांची किडनी लीना यांना दिली होती. पण काल लीना यांचा मृत्यू झाला.

लीना आचार्य यांनी ‘सेठ जी’, ‘आप के आ जाने से’, ‘मेरी हानिकारक बीवी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘हिचकी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.

‘सेठ जी’ या मालिकेत लीना यांच्या को-स्टार उपासना खन्ना यांनी इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘२०१५मध्ये लीना सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी सेठ जी या मालिकेत माझ्या आईची भूमिका साकारली होती. आमचे खूप चांगले नाते होते. मी मुंबईमध्ये एकटी राहत असल्यामुळे त्या माझ्यासाठी जेवण घेऊन यायच्या. लीना यांची गेल्या ४ महिन्यांपासून प्रकृती खालावली होती. त्या अतिशय चांगल्या अभिनेत्री होत्या.’