तेलुगू चित्रपटसृष्टीवर जवळपास सात दशके अधिराज्य गाजवून चित्ररसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविणारे ज्येष्ठ अभिनेता अकिनेनी नागेश्वर राव (९१) यांचे येथे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या नावावर २५० चित्रपट असून त्यात काही तामिळ चित्रपटांचा समावेश आहे. सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर राव यांच्या नावाची मोहोर उमटली आहे.
नागेश्वर राव यांच्या मंगळवारी कुटुंबीयांशी रात्री उशिरा गप्पागोष्टी झाल्या व नंतर झोपेतच त्यांचे निधन झाले असे त्यांचे पुत्र अभिनेते नागार्जुन यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात तीन मुली व दोन मुलगे आहेत.
प्रचंड इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या नागेश्वर राव यांनी आपला आजार गेल्या वर्षी जाहीरपणे सांगितला होता. नागेश्वर राव यांचा जन्म किनारी आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्य़ात झाला व त्यांनी त्याची कारकीर्द नाटकातील कलाकार म्हणून सुरू केली व १९४० मध्ये त्यांनी धर्मपत्नी हा पहिला चित्रपट केला त्यात त्यांनी स्त्री भूमिका केली होती. नंतर त्यांनी बतसारी, देवदास, प्रेमनगर, तेनाली रामकृष्ण, माया बाजार, मिसाम्मा व सीतारामय्या गरी मनरावलू हे चित्रपट केले. शरदचंद्र चटर्जी यांच्या कादंबरीवर बेतलेल्या ‘देवदास ’ चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. तेलुगू चित्रपटसृष्टी चेन्नईहून हैदराबादला नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने अन्नपूर्णा स्टुडिओ सुरू केला होता.
तेलुगू चित्रपटसृष्टीस व्यापक स्वरूप देऊन त्याची निर्मिती हैदराबादेत आणण्याचे श्रेय ‘एएनआर’ ऊर्फ अक्कीनेनी नागेश्वर राव यांच्याकडे नि:संशय जाते. तेलुगू चित्रपट व्यवसायाचे प्रारंभीचे केंद्र चेन्नईत होते. ते केंद्र हैदराबाद येथे आणण्यात राव यांचा सिंहाचा वाटा होता. एन. टी. रामाराव यांनी आपल्या अभिनयाद्वारे सामान्य लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले तर नागेश्वर राव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न भूमिका करून आपली ओळख प्रस्थापित केली. नागेश्वर राव यांच्या भूमिका सुशिक्षित मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय ठरल्या.
राव यांनी अनेक चित्रपट निर्मात्यांना चित्रपटांच्या निर्मितीसाठी उत्तेजन देऊन त्यासाठी हैदराबादेत त्यांना आमंत्रित केले.  स्वत: भूमिपुत्र म्हणवून घेणाऱ्या राव यांचे तेलुगू भाषेवर प्रचंड प्रेम होते. अभिनेता म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या मातृभाषेचा व्यवस्थित अभ्यास करून ती आत्मसात करा, असा सल्ला ते नातवंडांना देत असत.
त्यांनी अलीकडेच त्यांच्याच कुटुंबातील तीन पिढय़ांवर आधारित मानम हा चित्रपट पूर्ण केला होता. त्यात नागार्जुन व नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.