बहुप्रतिक्षित राफेल विमानाची प्रतीक्षा संपली असून पहिलं राफेल विमान काल(दि.९) हवाई दल दिनाच्या दिवशी फ्रान्सने भारताला सोपवलं. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: पहिल्या राफेल विमानाची पूजा केली. पूजा करताना त्यांनी राफेलवर कुंकवाच्या बोटाने ओम काढला आणि विमानाच्या चाकाखाली दोन लिंबं ठेवली होती. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे.

“पीएमसी बँकेच्या खातेदारांनी दोन-दोन लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाजाला लावून ठेवायला हवेत. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतं तर तुमचे पैसे का नाही”, अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेच्या व्यवहारांसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यावरुन दोन लिंबू ठेवून पीएमसी बँक देखील सुरक्षित करावी असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

दरम्यान, कालचा दसऱ्याचा दिवस भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक ठरला. फ्रान्सने पहिलं राफेल विमान भारताच्या ताब्यात दिलं. पूजा करुन झाल्यावर राजनाथ सिंह यांनी या विमानातून उड्डाणही केलं. राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसंच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहेत. हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. हे विमान आता भारतीय वायुदलाची ताकद वाढवणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये 2016 मध्ये 36 राफेल विमानांचा करार झाला होता. 2022 पर्यंत सर्व विमान भारताला मिळणार आहेत.