येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत  (एम्स) कोविड १९ वर एका औषधाच्या चाचण्या सुरू असून त्यात आश्वासक निष्कर्ष हाती आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू असे चाचण्या करण्यात आलेल्या या औषधाचे नाव आहे. गेले काही दिवस या चाचण्या सुरू असून आतापर्यंत तीन रुग्ण यात बरे झाले आहेत अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. शरमन सिंह यांनी दिली आहे. एकूण चार रुग्णांनी या औषधांचे उपचार करुन घेण्याची तयारी दर्शवली होती, त्यातील तीन बरे झाले असून त्यांना आता घरी पाठवण्यात आले आहे. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे रुग्णांवरील उपचारात जपानमध्ये वापरण्यात येणारे फॅविनपीरावीर या औषधाचाही समावेश केला जाणार आहे. मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू हे औषध जर वैद्यकीय चाचण्यात प्रभावी ठरले तर त्याचा वापर उपचारात समाविष्ट करण्यात येईल. मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू हे औषध कुष्ठरोगावर वापरले जाते व अलीकडेच भारतीय विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेने या औषधाचे कोविड १९ रुग्णांवरील परिणाम शोधण्यासाठी कॅडिला फार्मास्युटिकल्स कंपनीशी भागीदारी केली आहे. देशात कोविड १९ रुग्णांवर प्रयोग करण्याची परवानगी भारतीय औषध नियंत्रकांनी तीन संस्थांना दिली आहे, त्यात भोपाळच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचा समावेश आहे.