लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या हबीबुर रहमान या हँडलरला रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. मूळचा ओदिशा केंद्रपाडाचा रहिवाशी असलेला हबीब सध्या सौदी अरेबियात रियाध येथे वास्तव्याला होता. लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांच्या रहाण्याची, पैशांची व्यवस्था तो करायचा. रविवारी दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली.

भारतात बॉम्बस्फोट आणि अन्य अतिरेकी कारवाया घडवून आणण्यामध्ये लष्कर-ए-तय्यबाचा सहभाग आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार हबीबुर रहमानने शेख अब्दुल नईम उर्फ नोमी या दहशतवाद्याला मदत केली होती. नोमीला २००७ मध्ये दोन पाकिस्तानी आणि एका काश्मिरी दहशतवाद्याला बांगलादेशमार्गे भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत असताना अटक झाली होती.

त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये नईमला एका खटल्याच्या सुनावणीसाठी कोलकाताहून महाराष्ट्रात आणण्यात येत असताना तो फरार झाला होता. त्यानंतर नईम पाकिस्तानमधल्या आपल्या मोहरक्यांच्या इशाऱ्यावरुन काम करु लागला. भारतात कुठे दहशतवादी हल्ला करता येऊ शकतो त्याच्या जागा निवडण्याची जबाबदारी नईमवर सोपवण्यात आली होती. त्यासाठी नईमने वेगवेगळी बनावट नावे धारण केली.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगड या राज्यांमध्ये जाऊन त्याने दहशतवादी हल्ल्यांसाठी जागांची पाहणी केली. त्यावेळी हबीबुर रहमानने त्याच्या रहाण्या-खाण्याची, लपण्याची, पैशांची सर्व व्यवस्था केली होती. लष्करचा दहशतवादी अमजद उर्फ रेहानच्या सांगण्यावरुन त्याने ही सर्व व्यवस्था केली होती. नईमला पुन्हा नोव्हेंबर २०१७ मध्ये अटक करण्यात आली. हबीबुर रहमानची कोठडी मिळवण्यासाठी त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.