विवेकवादी लेखक एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ साहित्य अकादमी पुरस्कार परत करणाऱया लेखकांवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी प्रतिहल्ला चढवला. ‘हे लोक लिहिण्यास असमर्थ आहेत असे ते म्हणत असतील, तर आधी त्यांना लिहिणे थांबवू द्या, त्यानंतर आम्ही बघू, असे विधान शर्मा यांनी केले. साहित्य अकादमी हा पुरस्कार लेखकांकडूनच लेखकांना जाहिर केला जातो. त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, हा निर्णय आम्ही मान्य करतो, असे महेश शर्मा ‘द इंडियन एक्स्रेस’शी बोलताना शर्मा म्हणाले. तसेच लेखकांच्या विचारधारेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून शर्मा म्हणाले की, हे लोक कोण आहेत आणि त्यांची कुठल्या विचारधारेशी निष्ठा आहे याचाही विचार व्हायला हवा. हे लोक कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करत आहेत. आम्हीही या मुद्द्यावर त्यांच्या सोबत आहोत. त्यांची काही तक्रार असेल असल्यास त्यांनी ती मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठवायला हवी.

दरम्यान, या मुद्द्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचार करण्यासाठी साहित्य अकादमीने २३ ऑक्टोबरला तातडीची बैठक बोलावली आहे. आतापर्यंत २१ लेखकांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. कलबुर्गी तसेच दादरीतील एका मुस्लीम व्यक्तीची हत्या हे देशात जातीयवादी वातावरण आणि वाढलेल्या असहिष्णुतेचे निदर्शक असल्याचे या लेखकांचे म्हणणे आहे.