‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचा निकाल रविवारी लागला. पण मिस युनिव्हर्स कोण झाली यापेक्षा या स्पर्धेच्या सूत्रसंचालकाविषयीच अधिक चर्चा सुरु झाली आहे. स्टीव्ह हार्वे या कलाकाराने मिस युनिव्हर्स २०१५चे सूत्रसंचालन केले होते. पण, स्टीव्ह यांनी नेमका विजेतीच्या नावातच घोळ घातला आणि बघता बघता सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला. तर कोण आहेत हे स्टीव्ह हार्वे जाणून घेऊया.
स्टीव्ह हार्वे (वय ५८) हे अमेरिकेतील विनोदी कलाकार, टीव्ही सूत्रसंचालक, अभिनेता आणि लेखक आहेत. ‘द स्टीव्ह हार्वे मॉर्निंग शो’, ‘स्टीव्ह हार्वे’ (चर्चा कार्यक्रम) आणि ‘फॅमिली फ्यूड’ या कार्यक्रमांचे ते सूत्रसंचालक आहेत. रेडिओ वनवर रोज सकाळी लागणा-या ‘स्टीव्ह हार्वे मॉर्निंग शो’ चे त्यांनी २००५ सालापर्यंत सूत्रसंचालन केले. परंतु, हा कार्यक्रम इतका लोकप्रिय आहे, की त्याचे प्रसारण आजही रेडिओवर करण्यात येते. २०१४ साली सप्टेंबरमध्ये स्टीव्ह यांनी डिलाइटफुल या डेटिंग संकेतस्थळाची सुरुवात केली. महिलांना डेटींगला घेऊन जाताना नक्की काय करावे याविषयीचे हे संकेतस्थळ आहे. हार्वे यांनी ‘अॅक्ट लाइक अ लेडी, थिंक लाइक अ मॅन’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. ‘द ओरिजनल किंग्स ऑफ कॉमेडी’, ‘थिंक लाइक अ मॅन’, ‘लव्ह डोन्ट कॉस्ट अ थिंग, ‘द फाइटिंग टेम्पटेशन’, ‘जॉन्सन फॅमिली व्हेकेशन’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. हार्वे यांनी तीनवेळा ‘डेटाइम एमी अवॉर्ड’ पटकाविला आहे. तर ११ वेळा विविध विभागांत त्यांनी ‘एनएएसीपी इमेज अवॉर्ड’ही पटकाविला आहे.
स्टीव्ह यांचे तीन विवाह झाले असून त्यांना एकूण सात मुले आहेत.