बंडखोर काँग्रेस आमदारांच्या तक्रारी व अडचणींचे आपण निवारण करू, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याशी काँग्रेसच्या मनोमीलनानंतर बंडखोर आमदारांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.

सचिन पायलट यांनी १८ आमदारांना घेऊन गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले होते पण सोमवारी पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यात समाधानकारक तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते. राजस्थानमध्ये १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन होणार असताना महिनाभर पायलट यांच्या बंडाळीने काँग्रेस सरकारपुढे डोकेदुखी निर्माण झाली होती.

गेहलोत यांनी सांगितले, की या आमदारांनी बंड का केले होते हे माहिती नाही, त्यांना कुठली आश्वासने दिले होती ती पूर्ण झाली नाहीत याचीही माहिती नाही. जर आमदार माझ्यावर रागावले असतील, तर त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही माझी जबाबदारी आहे. पूर्वी मी तसेच केले आहे या वेळीही करीन, असे त्यांनी जैसलमेरहून निघताना सांगितले.

सचिन पायलट यांच्याबाबत ‘निकम्मा’ असा शब्दप्रयोग केल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. सोमवारच्या काँग्रेस बैठकीबाबत त्यांनी सांगितले, की निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील कृती ठरवली जाईल. पायलट यांच्या परतीसाठी कुठले सूत्र आहे हे माहिती नाही. ते पक्षश्रेष्ठींनाच माहिती असेल. पायलट हे तीन सदस्यीय समितीपुढे तक्रारी मांडतील. काँग्रेस सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील.  शिवाय पुढील विधानसभा निवडणुकाही काँग्रेस जिंकेल. भाजपने या वेळी आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला.

आम्ही शंभर आमदार एकत्र ठेवले. भाजपने त्यांना फोडण्याचा खूप प्रयत्न केला पण एकही त्यांच्याबरोबर गेला नाही. आम्ही या विश्वासू आमदारांना विसरणार नाही. या आमदारांनी इतिहास निर्माण केला आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांचा पालनकर्ता राहीन, लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मी आमदारांना पत्र पाठवले आहे. हा सगळा लोकशाही संरक्षणाचा लढा होता, असे गेहलोत यांनी सांगितले. जैसलमेरहून निघताना गेहलोत यांनी काँग्रेसची पूर्वीच साथ सोडणारे अपक्ष आमदार खुशवीर सिंह, ओमप्रकाश हुडला, सुरेश टँक यांची भेट घेतली.

सूडाचे राजकारण नको – पायलट

काँग्रेस पक्षाकडे आपण कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही, मात्र पक्षाच्या ज्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांच्याविरुद्ध सूडाचे राजकारण केले जाऊ नये अशी आपली इच्छा आहे, असे काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. पायलट यांचे जयपूर येथे आगमन झाले त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पक्षश्रेष्ठींनी ज्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे ती समिती लवकरच आपले काम सुरू करील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.