प्रकाशमित्र म्हणून मी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारत आहे, सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे देश अंधारयुगात गेला असून हा प्रदीर्घ काळचा अंधार दूर करण्यासाठी अमेरिकी मतदारांनी एकत्र यावे असे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार जो बायडेन यांनी केले आहे.

डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी त्यांनी आभासी माध्यमातून उमेदवारी स्वीकारली. ते म्हणाले, माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. मी जसा डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असेन तसाच देशाचा अध्यक्ष असेन. जे कुणी मला पाठिंबा देणार नाहीत त्यांच्यासाठीही मी तेवढय़ाच निष्ठेने काम करीन. तुम्ही जर मला निवडून दिलेत तर माझ्यातील जे काही चांगले आहे ते पणाला लावून देशाला प्रकाशवाटेने नेईन.

बायडेन म्हणाले की, ट्रम्प यांच्या काळात अमेरिका अंधारयुगात गेली. त्यातून देशाला बाहेर काढून प्रगतीकडे न्यावे लागेल. अमेरिका हा शक्यता व संधींचा देश आहे. या देशात प्रत्येकाला त्याची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. हे सगळे आपण संपवता कामा नये. सर्वाना संधी मिळाली तरच आपण देशाला पुढे नेऊ शकू.

ट्रम्प यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ट्रम्प यांच्या कारभारामुळे पराकोटीचा संताप, भीती, फुटीरता या भावना त्यामुळे उफाळून आल्या. मी देशाचा अध्यक्ष झालो तर माझ्यातील जे काही चांगले आहे ते देशासाठी देईन. अंधार दूर करून देशाला प्रकाशवाटेने नेईन. त्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे. भीतीवर आशेचा, विशेषाधिकारावर समान अधिकारांचा, कपोलकल्पिततेवर तथ्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय व्हायला हवा, त्यासाठी अमेरिकी लोकांनी एकजूट दाखवावी.

प्रत्येक अमेरिकी व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणे हे अध्यक्षांचे काम असते. अमेरिका हा रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षातील संघर्ष नव्हे तर त्यापेक्षा मोठे काही तरी आहे. प्रचार हा मते मिळवण्यासाठी नाही तर अमेरिकेतील लोकांचे  मन आम्हालाजिंकायचे आहे. हा विजय व्यापक असावा, त्यात स्वार्थी हेतू नाही.

देश पुढे नेणारे कामगार, केवळ वरिष्ठ स्थानी असलेले सोडून सामान्य लोक, ज्यांच्या मानेवर गुडघे रोवून पदोपदी अन्याय केला जातो ते समुदाय, आतापर्यंत संधीचा संकोच व वाढती असमानताच अनुभवलेली तरुण पिढी यांच्यासाठी आम्हालाजिंकायचे आहे त्यात कुठलाही स्वार्थी हेतू नाही, असे बायडन म्हणाले.