“आम्ही नक्कीच मारले जाऊ…आम्हाला अफगाणिस्तानातून त्वरित बाहेर काढण्याची तुम्हाला विनंती करतोय,” ही आर्त हाक आहे अफगाणिस्तानमधील तृतीयपंथीयांची. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर इथले तृतीयपंथी भीतीच्या सावटाखाली असून लपून जीवन जगत आहेत. अफगाणिस्तानमधील २५ वर्षीय समलिंगी पुरुष अफगाणिस्तानमधील शेकडो LGBTQ+ (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर) सदस्यांपैकी एक आहे. ज्याला तालिबान सरकारच्या काळात आपल्या जीवाची भीती आहे. या सदस्यांनी देशाबाहेरील मानवाधिकार वकिलांना तालिबानच्या राजवटीतून बाहेर पडण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेसह इतर देशांनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढलं. अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर या तृतीयपंथीय नागरिकांना अफगाणिस्तानमध्ये लपून राहायला भाग पाडलं जातंय. ते जर तालिबान्यांच्या तावडीत सापडले तर ते मारले जाऊ शकतात, हल्ला किंवा छळ होऊ शकतो, अशी भीती त्यांना आहे. अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवून एक महिना झालाय. या काळात त्यांनी महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्याचं दिलेलं वचन फोल ठरल्याचं दिसून आलंय. तसेच तालिबानने अद्याप तृतीयपंथीय लोकांबद्दल कोणतंच वक्तव्य न केल्यामुळे त्यांची भीती वाढत आहे.

दरम्यान, अनेकांना वाटतंय की तालिबान सरकार त्यांच्या पहिल्या राजवटीप्रमाणेच समलैंगिक लोकांसंदर्भातील नियमांचे पालन करेल. तालिबान सरकारच्या पहिल्या राजवटीत समलैंगिकतेला फाशीची शिक्षा होती. एलजीबीटीक्यू लोकांच्या हक्कांसाठी वकिली करणाऱ्या व्यक्तीनं सीएनएनला सांगितलं, की १५ ऑगस्टला काबूल ताब्यात घेतल्यानंतर काही लोक त्याला शोधत त्याच्या घरी आले. “त्यांनी माझ्या भावाला धमक्या दिल्या आणि त्यांनी त्याला सांगितले की जर मी घरी परतलो तर ते मला समलैंगिक असल्यामुळे ठार मारतील. अन्न आणि इतर साहित्याच्या कमतरतेमुळे मी कदाचित कधीच आपल्या घरी परत जाऊ शकणार नाही,” असे तो सांगतो.

“आम्ही एलजीबीटी आहोत. ही आमची चूक नाही. माझ्या नशिबात, माझ्या आत्म्यात ते लिहिले गेले आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. ते फक्त मला मारू शकतात,” असंही तो म्हणतो.