रविवारची सुट्टी ही काहीजणांसाठी खुपच खास होती. त्यामागचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे रशियामध्ये पार पडलेला फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना. फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या रंगतदार सामन्याकडे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक क्रीडारसिकाचं लक्ष लागून राहिलं होतं.

अतिशय मानाच्या अशा या सामन्यात फ्रान्सच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या क्रोएशियाचा ४-२ अशा फरकाने पराभव केला. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच फ्रान्सच्या संघाला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. या साऱ्यामध्ये क्रोएशियाच्या खेळाचीही अनेकांनीच प्रशंसा केली. भारतातूनही अनेकांनीच ट्विट करत, किंवा शक्य सर्व मार्गांनी फ्रान्सचा विजय साजरा केला. पण, यामध्ये विशेष लक्षवेधी ठरलं ते म्हणजे किरण बेदी यांचं ट्विट.

पुद्दुचेरीच्या (पाँडिचेरि) उपराज्यपालपदी असणाऱ्या किरण बेदी यांनी ज्या अंदाजा फ्रान्सच्या विजयाविषयीचं ट्विट केलं तो अंदाज अनेकांनाच खटकला. फ्रान्स वसत्यांमुळे पुद्दुचेरीवर असणारा फ्रेंचांच्या प्रभावाकडे लक्ष वेधत त्यांनी याचं थेट नातं पुद्दुचेरीशी जोडलं आणि पुद्दुचेरीवासियांनाबही या विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत फ्रान्सच्या संघातील खेळाडूंमध्ये असणाऱ्या विविधतेविषयीसुद्धा त्यांनी ट्विट केलं. पण, त्यांचं हे ट्विट अनेकांनाच खटकलं.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

किरण बेदींच्या या ट्विटवर अनेकांनीच त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. तुम्ही वसतीकरणाला पाठिंबा देता… एखाद्या संघाचा पाठिंबा देण्याची ही पद्धत योग्य नाही, असं एका युजरने ट्विट केलं. तर, पुद्दुचेरी फ्रेंच वस्त्यांचा भाग होतं ही बाब इथे नमूद करण्याची गरजच नव्हती, असं म्हणत त्यांची चूक नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे एकिकडे फ्रान्सच्या विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तर दुसरीकडे मात्र किरण बेदींच्या या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं होतं.