05 June 2020

News Flash

मास्कवर विषाणूचे आयुर्मान आठ दिवसांपर्यंत

चीनच्या संशोधन अहवालातून उघड

संग्रहित छायाचित्र

कोविड-१९ च्या संसर्गासाठी कारणीभूत ठरणारा विषाणू चेहऱ्याच्या मास्कवर एका आठवडय़ापर्यंत; तर चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर काही दिवसांपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे.

तथापि, हा विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-१९ विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर ४ दिवसांपर्यंत, तर फेस मास्कच्या बाहेरच्या स्तरावर एका आठवडय़ापर्यंत चिकटून राहू शकतो, असे वृत्त हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निग पोस्टने सोमवारी दिले. कोविड-१९ चे स्थैर्य आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबाबत जगभरात सुरू असलेल्या संशोधनात भर घालणारे हे संशोधन दि लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

* कोविड-१९ विषाणू हा अनुकूल वातावरणात मोठय़ा प्रमाणावर स्थिर राहू शकतो, मात्र त्याला प्रमाणित जंतुनाशक पद्धतींचा धोकाही असतो’, असे हाँगकाँग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील लिओ पून लिटमन व मलिक पेइरिस यांच्यासह इतर संशोधकांनी म्हटले आहे.

अहवालात काय?

* हा विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या पृष्ठभागांवर किती काळपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो याची संशोधकांनी चाचणी केली. छापील कागद व टिश्यू पेपरवर तो ३ तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसऱ्या दिवसापर्यंत नाहीसा झाला.

* काच आणि चलनी नोटा यांवर तो दुसऱ्या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो ४ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत होता.

* धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू ७ दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले.

* त्यामुळेच, सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:20 am

Web Title: life expectancy of the virus on the mask for up to eight days abn 97
Next Stories
1 आयुर्वेदाच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढवा!
2 प्राणी, पक्ष्यांमुळे वीज खंडित होण्याचे शहरी-ग्रामीण भागात प्रकार
3 “१५ एप्रिलनंतर भारतात आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा”
Just Now!
X