काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवन सलग ९७व्या दिवशी विस्कळीत राहिले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरच्या अंतर्गत भागात गुरुवारीही संचारबंदी कायम होती. श्रीनगरमधील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही संचारबंदी लागू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नौहट्टा, खानयार, रैनवारी, सफाकदल व महाराजगंज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लोकांच्या हालचालींवर र्निबध लादण्यात आले आहेत.

काश्मीरमध्ये इतरत्र लोकांच्या हालचालींवर र्निबध नसले, तरी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे कलम लागू असल्याचेही हा पोलीस अधिकारी म्हणाला. राज्यातील संवेदनशील भागांमध्ये कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. लोकांना कुठल्याही दहशतीशिवाय त्यांचे दैनंदिन व्यवहार पार पाडता यावेत हा उद्देश त्यामागे आहे. श्रीनगरच्या सिव्हिल लाइन्स भागात तसेच लाल चौक या व्यावसायिक क्षेत्रात खासगी वाहने व ऑटोरिक्षा यांची वाहतूक वाढली होती. तथापि, काश्मीर खोऱ्यात मात्र सामान्य जनजीवन विस्कळीत होते.