यकृत हा मानवी शरीरातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील पचनसंस्थेचा महत्त्वाचा घटक असलेले यकृत बिघडले की त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. जगभरात यकृताच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. मात्र या आजाराचे निदान करणे वैद्यक व्यावसायिकांसाठी अवघड काम आहे. अशा परिस्थितीत लिमोनिन नावाच्या नैसर्गिक रसायनाने शास्त्रज्ञांना आशेचा किरण दाखवला आहे. लिंबू वर्गातील फळांमध्ये आणि काही अन्य भाज्यांमध्ये मुबलकपणे उपलब्ध असलेले हे रसायन यकृतविषयक रोगांचे निदान करण्यात उपयोगी ठरू शकते, असा निष्कर्ष येथील संशोधकांनी काढला आहे.
यकृताचा कर्करोग आणि अन्य विकारांचा जगभर मोठय़ा प्रमाणात प्रसार होत आहे. पण तितकेच त्यांचे निदान करणे जटिल होत आहे. एकटय़ा ब्रिटनमध्ये गेल्या काही दशकांत यकृत विकार हे मृत्यूचे तिसरे मोठे कारण बनले आहे. मात्र बरेचसे यकृताचे आजार वेळेवर लक्षात येत नाहीत. त्यांचे निदान करेपर्यंत रोग बराच बळावलेला असतो आणि उपचारांचा उपयोग होण्याची शक्यता कमी झालेली असते. मात्र लिमोनिनमुळे ही समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.
यासाठी शास्त्रज्ञांनी निरोगी आणि यकृताच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींच्या श्वासाचे नमुने तपासून त्यांची तुलना केली. रोगी व्यक्तींच्या श्वासाला विशिष्ट प्रकारचा वास येत होता. त्याला लिमोनिन कारणीभूत होते, असे संशोधनात आढळले. यकृताची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे हे रोगी लिमोनिनचे पृथक्करण करू शकत नव्हते आणि त्यामुले त्यांच्या श्वासाला विशिष्ट वास येत होता. त्यानंतर ज्या रोग्यांच्या शरीरीत यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे, अशांच्या श्वासाचे नमुने तपासण्यात आले. त्यांच्या श्वासातील हा वास कमी कमी होत गेलेला दिसला.

यकृताच्या रोग्यांच्या श्वासाला वेगळा वास येतो हे पूर्वीही वैद्यकशास्त्राला माहीत होते. पण लिमोनीनमुळे आजाराचे वेळीच निदान करता येऊ शकते, ही बाब नव्याने पुढे आली आहे. यामुळे विशेषज्ञ नसलेले डॉक्टरही प्राथमिक पातळीवर यकृताच्या विकाराचे निदान करू शकतील आणि रुग्णांना उपचार मिळण्याची शक्यता वाढेल.
 डॉ. मार्गारेट ओहारा, संशोधक, लंडन.