मद्यसेवनामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेत आणि राजकीय वर्तुळात उमटलेल्या प्रतिक्रियेची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मद्यपान करणे हे देशविरोधी कृत्य ठरवत यापुढे मद्यपान करणाऱ्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार असून यासाठी अमेरिकेतील एफबीआयची देखील मदत घेतली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी भारतातील एका ख्यातनाम अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी अभिनेत्रीने मद्यपान केल्याचे समोर आले होते. अभिनेत्रीचे सिनेसृष्टीतील योगदान आणि देशातील नागरी पुरस्काराने झालेला सन्मान पाहता अभिनेत्रीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, मद्यपान करणाऱ्या अभिनेत्रीला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले, असा प्रश्न व्हॉट्स अॅपवरुन विचारला जात होता. हाच मेसेज एका नेत्याने भरसभेत वाचून दाखवत आपले वैचारिक दारिद्य्र दाखवून दिले होते.
जनता व राजकीय नेत्यांमध्ये तीव्र उफाळून आलेली देशप्रेमाची भावना पाहता निवडणूक आयोगानेही ‘मौके पे चौका’ मारला आहे. मद्यपान करणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. उमेदवारांबाबत कठोर भूमिका घेण्यात आली असली तरी कार्यकर्ते व मतदारांनी मतदानाच्या 48 तास पूर्वी मद्यपान केलेले नसावे, अशी अट टाकण्यात आल्याने किरकोळ दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. मदिरेचा अभिषेक केल्याशिवाय निवडणुकीत विजयाचा प्रसाद मिळत नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा अभिषेक कशाचा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न: निवडणूक आयोग
गेल्या काही दिवसांमध्ये जनता व नेत्यांना तिरंग्याची चिंता वाटत होती. तिरंग्याची शान महत्त्वाची आहे. देशात निवडणूक ही सर्वात पवित्र प्रक्रिया आहे. यात मद्याचा दुरान्वयेही संबंध येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

‘दारु सोडा’ क्लासचा धंदा तेजीत
आयोगाच्या निर्णयानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गुगलवरुन ‘दारु सोडा’चे क्लासेसचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. काहींनी जवळच्या मित्रमंडळींना व्हॉट्स अॅपवर मेसेज करुन अशा क्लासेसची चौकशी केल्याचे समजते. दारु व्यसनमुक्तीसोबत शरीरात मद्याचे अंश सापडू नये, यासाठी काही उपाय आहे का, याचाही शोध काहींनी सुरु केला आहे.

पतंजलीच्या दुधाचे वाटप

दारुबंदीच्या दिशेने हालचाली सुरु होताच रामदेवबाबा यांच्या ‘पतंजली’नेही संधीचे सोने करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतजलीतर्फे निवडणुकीच्या काळात गल्लोगल्ली दुधविक्री केंद्र सुरु केले जाणार आहे. या दुध केंद्रावर कार्यकर्ते व मतदारांना दुधवाटप केले जाणार आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात या केंद्रांवर दुधविक्री केली जाणार आहे. याशिवाय व्यसनमुक्तीसाठी योगशिबीरांचेही आयोजन केले जाणार असून या शिबीरासाठी सर्वच राजकीय पक्षांशी बोलणी सुरु असल्याचे समजते.

 

एफबीआयची मदत घेणार
भारत – अमेरिकेतील संबंध सुधारत असून बराकनंतर आता डोनाल्ड राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. हे ट्रम्प महोदय देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत. त्यामुळे निवडणुकीतील दारु बंदीच्या कामात एफबीआयच्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जाईल. मैत्रीपूर्ण संबंधामुळे एफबीआयकडूनही लगेच होकार मिळेल, असे दिसते. निर्णयाला फारसा विरोध होणार नाही. या लॅबचे कर्मचारी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराची तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांची वैद्यकीय चाचणी करतील, असे समजते.

(तळटीप – या बातमीचा प्रत्यक्ष जीवनाशी काहीच संबंध नाही. तसेच या बातमीतून देशप्रेम किंवा कोणत्याही नेत्यांच्या व त्यांच्या भक्ताच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून तसे झाल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.)