सरकारनं पेट्रोलच्या भावांमध्ये जी वाढ केलीय त्याला काही आधार नाहीये. आमचं सरकारला आव्हान आहे की पूर्णपणे शुद्ध केलेलं पेट्रोल दिल्लीत 34 रुपये व मुंबईत 36 रुपयांना मिळू शकतं, मग हे दुप्पट दर का असा प्रश्न विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे तत्कालिन प्रवक्ते प्रकाश जावडेकरांनी काही वर्षांपूर्वी विचारला होता.
सध्या पेट्रोलचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर असून कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर सलग 10 दिवस पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. पेट्रोलचे भाव सध्या प्रति लिटर 85 रुपयांच्या घरात पोचले असून केंद्र सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. जावडेकरांचा हा व्हिडीयो सध्या व्हायरल होत असून यामध्ये विरोधात असताना ते जे बोलतायत ते सत्तेत असतानाच्या वागण्याच्या विपरीत असल्याचे दिसत आहे.