आपल्या लहानशा झोपडीत पिण्याच्या पाण्याचा हातपंप बसविण्यात आल्याचा आनंद ६८ वर्षीय बाळादेवींच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. मूलभूत गरज म्हणून हातपंप यापूर्वीच बसविण्यात आला असता तर अधिक उचित ठरले असते. निवडणुकीच्या वेळी हातपंप बसविण्यात आला ते सयुक्तिक वाटत नाही, अशी चर्चा दिल्लीतील एका मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, भाजपचे विजेंद्र गुप्ता आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याने या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील बहुसंख्य परिसरात विकासाच्या खुणा स्पष्ट दिसत असल्या तरी काही भागांत मूलभूत सुविधांची वानवाच आहे.
मुख्यमंत्री शीला दीक्षित गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांच्या विकासाच्या मॉडेलचा या निवडणुकीत कस लागणार आहे. मतदारसंघातील एकूण १.१८ लाख मतदारांपैकी ६० टक्के मतदार हे शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आहेत.