दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून दगडफेक केल्याबद्दल आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष आणि शाजिया इल्मी यांच्याविरोधात दंगल घडविल्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या दोनही ‘आप’नेत्यांना प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शाजिया इल्मी यांना दिल्ली महिला पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानावरून, तर आशुतोष यांना पोलिसांनी ‘आप’च्या मुख्य कार्यालयातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारतीही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. 
‘आप’चे नेते आशुतोष आणि शाजिया इल्मींविरोधातही गुन्हा
भाजपच्या कार्यालयाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्याबद्दल पोलीसांनी याआधीच आपच्या १४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आशुतोष आणि शाजिया इल्मी यांच्याही नावांचा समावेश एफआयआरमध्ये करण्यात आल्याने त्यांनाही अटक होण्याची शक्यता होती. परंतु, अटक करण्यात आल्याची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही. केवळ चौकशीसाठी आशुतोष आणि शाजिया इल्मी यांना ताब्यात घेतल्याचे समजते.