आसाममध्ये भाजपने मिळवलेले निर्भेळ यश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे जयललिता आणि ममता बॅनर्जींचे झालेले पुनरागमन आणि केरळमध्ये डाव्यांनी मिळालेली संधी हेच आज निकाल लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, काँग्रेसला पुन्हा एकदा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आसाम आणि केरळ या दोन्ही राज्यांतील सत्ता काँग्रेसने गमावली आहे. तर दुसरीकडे एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची तामिळनाडूतील परंपराही मोडीत निघाली आहे.
बंगालवासियांचा ममतांवर पुन्हा विश्वास
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने निर्भेळ यश मिळवले असून, ममता बॅनर्जी यांना जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. २०११ मधील निवडणुकीपेक्षा तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसच्या साथीने पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे डाव्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, जनतेने त्यांना थेटपणे नाकारले असल्याचे जागांवरून दिसते. प्रचारात ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करणाऱ्या भाजपलाही मतदारांनी नाकारले आहे. भाजप आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
द्रमुकच्या पर्यायाला नापसंती
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत पुन्हा एकदा मतदारांनी जयललिता यांच्याच पारड्यात आपला विश्वास टाकला आहे. तामिळनाडूमध्ये दर पाच वर्षांनी खांदेपालट होत असतो आणि तेथील नागरिक एकदा द्रमुकला तर एकदा अण्णा द्रमुकला संधी देत असतात. १९८४ पासून चालत आलेली ही परंपरा यावेळी पहिल्यांदाच मोडली असून, जयललिताच राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने काँग्रेसशी आघाडी केली होती. पण निवडणुकीत त्याचा किंचितही फायदा द्रमुकला झालेला दिसत नाही. आणखी पाच वर्षे द्रमुकला विरोधातच बसावे लागणार असल्याचे निश्चित आहे.
केरळमध्ये काँग्रेस आघाडीची पिछाडी
केरळमध्ये मुख्यमंत्री ओमन चंडी यांना मतदारांनी नाकारले असून, डाव्या आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. देशात या एकमेव राज्यात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता येणार असल्याचे निकालांवरून स्पष्ट होते. डाव्या आघाडीने केरळमध्ये मोठी मुसंडी मारल्याचेही दिसून आले आहे.
आसाममध्ये भाजपची मुसंडी
आसाम तरूण गोगोई यांच्या हातून सत्ता गेली असून, तिथे भाजपच्या नेतृत्त्वाखाली सर्बानंद सोनोवाल यांचे सरकार येणार हे नक्की झाले आहे. भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल. कारण यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचा प्रवेश झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून आसाममध्ये असलेली काँग्रेसची सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपने रचलेल्या व्यूहनितीला यंदा यश आले आहे.
पुडुचेरीमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत
पुडुचेरीमध्येही काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले असल्याचे निकालांवरून दिसते.