राजस्थानातील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळावजवळ एक जिवंत बॉम्ब अढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बॉम्बची तपासणी करण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अद्याप अधिक माहिती कळू शकलेली नाही.


गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे. यापूर्वी पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळावर अशाच प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या जिवंत बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावलं उचलत पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये हवाई हल्ला करीत जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्धवस्त केला होता. या पार्श्वभूमीवर भारतातील सैन्य तळांना पाकिस्तानकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली होती, त्यामुळे देशभरात हायअॅलर्ट जारी करण्यात आला होता.