News Flash

भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर- मोदी

मोदींच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात परिषदेचे उद्घाटन.

भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते मंगळवारी गांधीनगर येथील ८ व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आमचे सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जागतिक मंदीच्या काळातही भारताने चांगला विकास केला आहे. त्यामुळे भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकदार बिंदू बनला आहे. आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा सर्वात मोठा ब्रँड बनेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी मोदी यांनी जपान आणि कॅनडा या देशांसह व्हायब्रंट गुजरात परिषदेतील सहभागी देशांचे आणि संस्थांचे आभार मानले. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मभूमी असणारा गुजरात भारताच्या उद्यमशीलतेचे प्रतिक आहे. लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. काही लोकांना लोकशाही व्यवस्था प्रभावी आणि गतिमान नसल्याचे वाटते. मात्र, लोकशाहीतही जलद गतीने निकाल पाहायला मिळतात, हे गेल्या अडीच वर्षात दिसून आल्याचे मोदींनी सांगितले. भारत हा जगात सर्वाधिक उत्पादन करणारा सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे. तसेच येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी देशात पर्यटनाच्यादृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी सांगितले.

या परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ गुजरातमधील रूग्णालये व वैद्यकीय सुविधा, महाविद्यालये आणि शाळांना ‘जिओ’च्या माध्यमातून जोडणार असल्याची घोषणा केली. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार, नोबेल पारितोषिक विजेते, उद्योगक्षेत्रातील बड्या असामींसह तब्बल १५ हजार जण उपस्थित होते.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरात समिट आयोजित करण्यास सुरूवात केली होती. चार दिवसांचे व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगरमधील महात्मा गांधी मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. या समिटचे १२ देश भागीदार आहेत. समिटमध्ये जवळपास २० राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीसह जगभरातील अनेक देशातील प्रमुख यात सहभाग घेणार आहेत. याबरोबर भारत-अमेरिकेच्या परदेश संबंधाविषयी सहाय्यक मंत्री निशा देसाई बिस्वालही प्रतिनिधीमंडळासह उपस्थित राहणार आहेत. समिटमध्ये केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याता, रवांडाचे अध्यक्ष पॉल कगामे, पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा आणि सर्बियाचे पंतप्रधानही सहभागी होणार आहे. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा, डेन्मार्क, फ्रान्स, जपान, पोलँड, सिंगापूर, स्वीडन आणि युएई हे या समिटचे भागीदार देश आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 4:30 pm

Web Title: live pm modi inaugurate vibrant gujarat summit mukesh ambani and ratan tata present at event
Next Stories
1 जॅकी श्रॉफ,अर्जुन रामपाल उत्तरप्रदेशच्या ‘राजनिती’मध्ये; भाजपचा करणार प्रचार
2 प्रतीक्षा संपली! १९ जानेवारीला ‘रेडमी नोट ४’ भारतात होणार लाँच
3 मोदीबाबू प्लॅस्टिक मनीचे विक्रेते झाले आहेत; ममता बॅनर्जींची टीका
Just Now!
X