केंद्रातील मोदी सरकारला वेळोवेळी उपदेशाच्या मात्रा देऊ करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दादरी प्रकरणावर मौन बाळगणेच योग्य असून त्यावर काही बोललो तर अटलजींना आवडणार नाही, असे विधान अडवाणी मंगळवारी केले.
‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना अडवानींनी दादरी प्रकरणावर बोलणे टाळले. दादरी प्रकरणावर बोललो तर अटलबिहारी वाजपेयींना आवडणार नाही, अशी प्रतिक्रिया अडवाणी यांनी दिली. सध्या देशात जे काही सुरू आहे त्यामधून भाजप सरकारच्या त्रूटी दिसत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्लाही अडवाणी यांनी देऊ केला. सरकार सध्या काम करीत आहे पण पुढे आणखी बरेच काम करावे लागणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, दादरी प्रकरणावरून भाजप सरकार विरोधात आता वातावरण चांगले तापले आहे. दादरी प्रकरण हा भाजप सरकारचा सुनियोजित कट असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केला आहे. तसेच भारतातील अल्पसंख्याकांच्या दुर्दशेला भाजप सरकारला जबाबदार धरून खान संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस बान की मून यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात आझम खान यांनी भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी भाजप सरकारकडून पद्धतशीरपणे कट आखला जात असल्याचे नमूद केले आहे.
मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कठेरिया आणि उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी आझम खान यांच्या आरोपांचे खंडन केले. आझम खान यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशाप्रकारचे विधान करीत आहेत, असा टोला कठेरिया यांनी लगावला आहे.