येत्या पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात. राम जन्मभूमी आंदोलनात या दोन्ही नेत्यांनी ९० च्या दशकात महत्त्वाची भूमिका बाजवली होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोहन भागवत, उमा भारती यांना निमंत्रण

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारने भूमिपूजन कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत व्यवस्था केली आहे. करोना व्हायरस आणि वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि हिंदुत्व चळवळीशी संबंधित असलेले नेते व्हिडीओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.

आणखी वाचा- टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित

प्रशासनाने व्हिडीओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या टॉप १० नेत्यांची यादी तयार केली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान मोदींसोबत अन्य चार नेते मंचावर उपस्थित राहतील असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार यांनादेखील भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.