बाबरी मशिदप्रकरणात खटला सुरु असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतःच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी दिले आहे. अडवाणींना भाजपने डावलले हे म्हणणेही चुकीचे असल्याचे चिन्मयानंद यांनी म्हटले आहे.

भाजपप्रणित एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. लालकृष्ण अडवाणींना डावलून मोदी-शहा जोडीने कोविंद यांना उभे केल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वामी चिन्मयानंद यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. भाजपने अडवाणींना डावलले नाही. त्यांनी स्वतःच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. बाबरी मशिद खटल्यात अडवाणींचे नाव आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे चिन्मयानंद यांनी सांगितले.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न विचारला असता चिन्मयानंद म्हणाले, राष्ट्रपतीपदानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवार कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. अयोध्येत राम मंदिर बांधणे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टानेही यावादावर चर्चेद्वारे तोडगा काढावा असे म्हटले आहे. पण समोरुन आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही असा दावा त्यांनी केला. राम मंदिराच्या कामासाठी केंद्र सरकार कायदा मंजूर करु शकते. यापूर्वी सोमनाथ मंदिराच्या जिर्णोध्दारासाठीही केंद्र सरकारने कायदा मंजूर केला होता अशी आठवण त्यांनी सांगितली. आता केंद्र आणि उत्तर प्रदेशात भाजपचेच सरकार असल्याने हा कायदा मंजूर करता येईल असे त्यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप निश्चित केला होता. याचा दाखला देत चिन्मयानंद यांनी हे विधान केले आहे.