आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड होऊन २४ तास उलटायच्या आत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी सर्व पदांचा सोमवारी त्याग केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी संसदीय मंडळ, निवडणूक समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदांचा त्याग करीत असल्याचे म्हटले आहे.
शामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी घडविलेला भाजप आता उरलेला नाही, अशी बोचरी टीकाही अडवानी यांनी आपल्या पत्रात केलीये. पक्षापेक्षा काही नेत्यांना स्वतःचाच कार्यक्रम पुढे रेटण्यात जास्त रस आहे. पक्ष सध्या ज्या दिशेने पुढे चालला आहे. ते बघता पक्षासोबत पुढे जाणे आता अवघड असल्याचे अडवानी यांनी म्हटले आहे.
लालकृष्ण अडवानी यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांना पाठवलेले राजीनामा पत्र;

अडवानी पक्षातील घडामोडींवर नाराज असल्याचे गेल्या दोन दिवसांतील घडामोडींवरून लक्षात आले होते. गोव्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला आणि त्या अगोदर झालेल्या पदाधिकाऱयांच्या बैठकीला अडवानी यांनी दांडी मारली होती. आजारपणामुळे या बैठकीला येणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यातच मोदी यांच्या काही समर्थकांनी शनिवारी अडवानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर अडवानी यांच्या पदत्याग करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अग्रलेख – ‘नमो’नियाची बाधा