शहीद होण्यासाठीच लष्करात अथवा पोलीस दलात लोक भरती होतात, असे वादग्रस्त विधान बिहारचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री भीमसिंग यांनी केल्याने विरोधी पक्ष संतप्त झाले असून, भीमसिंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या शहीद जवानांचे पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानाने जयप्रकाश नारायण विमानतळावर आणण्यात आले, त्या वेळी जद(यू)चे मंत्री अनुपस्थित असल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भीमसिंग यांनी वरील वादग्रस्त विधान केले.
त्यानंतर भीमसिंग यांनी आपला मोर्चा पत्रकारांकडे वळविला. आपण आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी विमानतळावर आला आहात आणि त्यासाठीच तुम्हाला वेतन दिले जाते, असे भीमसिंग पत्रकारांना उद्देशून म्हणाले. शहीद जवानांचे पार्थिव स्वीकारण्यासाठी तुझे वडील आले आहेत का, असा सवालही भीमसिंग यांनी एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या पत्रकाराला केला.