लॉकडाउन 4.0 मध्ये आर्थिक, व्यावसायिक घडामोडींना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे निर्बंध आणखी शिथिल केले जाऊ शकतात. पण त्याचवेळी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कठोर निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.  इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. देशाला Covid-19 बरोबर जगणे शिकावे लागेल. लॉकडाउन 4.0 मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्तीत जास्त निर्बंधांमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न असेल.

“लॉकडाउन पूर्णपणे उठवण्यात यावा, अशी कुठल्याही राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची मागणी नाही. पण आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्यासाठी त्यांना एक्झिट प्लान हवा आहे” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर इंडिया टुडेला सांगितले.

लॉकडाउन 4.0 मध्ये देशाच्या कुठल्याही भागात शाळा, कॉलेज, चित्रपटगृह, थिएटर उघडायला परवानगी मिळणार नाही. पण सरकार सलून, स्पा सेंटर रेड झोनमध्ये उघडण्यासाठी परवानगी देऊ शकते. पण कंटेनमेंट झोनमध्ये सलून, स्पा यांना परवानगी मिळणार नाही. लॉकडाउन 4.0 मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, त्यासंबंधी केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून शिफारशी मागवल्या होत्या.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम आणि तेलंगण ही राज्ये लॉकडाउन वाढवावा या मताची आहेत. लॉकडाउनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ल़़ॉकडाउन 4.0 मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टप्याटप्याने सुरु होऊ शकते. बस, रेल्वे आणि देशांतर्गत हवाई प्रवास पुढच्या काही दिवसात टप्प्याटप्याने मर्यादीत स्वरुपात सुरु होऊ शकतो.