हनोई : व्हिएतनाममध्ये दक्षिण भागात करोनाचा प्रसार वाढू लागल्याने तेथे दोन आठवडय़ांची संचारबंदी रविवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. लागोपाठ तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांची संख्या तीन हजारांहून अधिक झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मेकाँग डेल्टा व हो चि मिन्ह शहर या महानगरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. ही दोन्ही ठिकाणे व्हिएतनामची आर्थिक राजधानी असून ३५ दशलक्ष लोक या ठिकाणी राहतात. व्हिएतनामची एक तृतीयांश लोकसंख्या या भागात राहते.

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे,की एप्रिलमध्ये करोना पुन्हा सुरू झाल्यानंतर करोनाबाधितांची संख्या पन्नास हजारावर गेली आहे. मधला बराच काळ रुग्णवाढ झाली नव्हती. एकूण २२५ जण कोविडने मरण पावले असून एप्रिलमध्ये १९० जणांचा मृत्यू झाला होता.  हो  ची मिन्ह शहर हे या करोना उद्रेकाचे केंद्र ठरले असून तेथे पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मे महिन्यानंतर तेथे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडले होते.

डेल्टा उपप्रकारामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असून लोकांच्या सुरक्षेला आम्ही अग्रक्रम दिला आहे,  असे पंतप्रधान फॅम मिन्ह चिन म्हणाले.

दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून निवडक कार्यालये व उद्योग सुरू ठेवण्यात आले आहेत. कोविड १९ नियंत्रण समितीचे अध्यक्ष असलेले उपपंतप्रधान वू डक डॅम यांनी म्हटले आहे, की संसर्गाचा दर कमीत कमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १.२४ कोटी लोकांपैकी ६० लाख लोकांना कोव्हॅक्स उपक्रमात लस मिळाली आहे.