करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. पण यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मात्र हाल होत आहेत. रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेल्या या स्थलांतरित मजूरांची पावले आता आपल्या गावाकडे वळली आहेत.

अशाच मजुरांपैकी एक असलेला बंटी संपूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीहून उत्तर प्रदेशात आपल्या गावी जाण्यासाठी निघाला आहे. लॉकडाउनमुळे कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने हे संपूर्ण कुटुंब पायीच दिल्ली ते उत्तर प्रदेश प्रवास करणार आहे.

‘आम्ही इथे काय खाणार? दगड खाऊ शकत नाही’ अशी प्रतिक्रिया कुटुंबातील महिलेने दिली. तिच्या डोक्यावर एक निळी बॅग होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचे सर्व साहित्य होते. बंटीचे त्याच्या मुलाला खांद्यावर बसवले होते. “दिल्लीत काही नाही, इथे कोणी मदत करणार नसल्यामुळे आम्ही गावी निघालो आहोत” असे या कुटुंबाने सांगितले.

उत्तर प्रदेश अलीगडमध्ये या कुटुंबाचे घर आहे. गावी पोहोचण्यासाठी त्यांना पायीच १५० किलोमीटर अंतर कापावे लागणार आहे. या कुटुंबाला घरी पोहोचण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. या प्रवासा दरम्यान त्यांच्याकडे पुरेसे पैसे आणि अन्नाचीही सोय नाहीय. बंटी प्रमाणेच अनेक स्थलांतरित मजुरांची सध्या अशीच स्थिती आहे.