करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन वाढवलेलं आहे. मात्र या काळात गाळात रुतणारं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी केंद्र व सर्व राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने पावलं उचलताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांत काही अटींसह दारुची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र गोवा राज्यातील बिअर शॉप धारकांना सध्या वेगळीच चिंता सतावते आहे. गोवा राज्याचा बहुतांश महसूल हा पर्यटन आणि दारु यावर अवलंबून आहे. केंद्र सरकारने बिअर दुकानं उघडण्यास परवानगी दिली असली तरीही परदेशातून येणाऱ्या मालावर अद्याप बंदी असल्यामुळे गोव्यातील दुकानांमधला स्टॉक संपण्याची भीती येथील दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

गोव्यात स्कॉच आणि व्हिस्की हे प्रकार इंग्लंडमधून आयात केले जातात. याव्यतिरीक्त फ्रान्स, स्पेन आणि इटली या देशांमधली दारुनही गोव्यात आयात केली जाते. मात्र सध्याचे नियम पाहता येत्या एक-दोन महिन्यांमध्ये हा सर्व साठा संपून जाऊ शकतो. ४ मे पासून गोव्यात बिअर शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे. सुमारे १३०० दुकानांमध्ये दारुचा योग्य साठा आहे. मात्र हा फारकाळ टिकेल याची शक्यता कमी असल्याचं वक्तव्य गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी केलं आहे. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

गोव्यातही काही प्रमाणामध्ये दारु तयार केली जाते, परंतु यासाठी लागणारा कच्चा माल हा इतर राज्यातून मागवला जातो. बहुतांश माल हा उत्तर प्रदेशातून येतो, सध्याच्या काळात राज्यांच्या सीमाही बंद केल्या असल्यामुळे दुकानं सुरु झाल्यानंतर कच्च्या मालाअभावी गोव्यात दारु तयार करण्यावरही बंधनं येऊ शकतात. दुकानं सुरु झाल्यानंतर ८ ते १० दिवस पुरेल इतकाच बिअरचा स्टॉक असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. गोव्यात अजुनही पर्यटकांना येण्यास परवानगी नसल्यामुळे दारुच्या व्यवसायावर ७० टक्के परिणाम होऊ शकतो अशी भीतीही नाईक यांनी बोलून दाखवली. त्यामुळे पर्यटन सुरु झाल्याशिवाय दारुच्या उद्योगाला चालना मिळणार नाही, असं नाईक यांनी स्पष्ट केलं.