करोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील तीन आठवडे म्हणजेच २१ दिवस संपूर्ण देशभरात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ही बंदी मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाली.

देशात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना उद्देशून भाषण केले. देशाला करोनापासून वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे लोकांनी घरातच राहून महासाथीच्या संसर्गाची शक्यता टाळणे. लोकांनी स्वत:वर संयम ठेवून या पर्यायाचे पालन केले तरच आपण सगळे या प्रचंड संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू. अन्यथा, आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल आणि ही किंमत किती मोठी असेल, याचा अंदाजही लावणे कठीण आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हात जोडून देशवासीयांना घराबाहेर न पडण्याची कळकळीची विनंती केली.

जनता संचारबंदी सर्वानी संवेदनशीलता दाखवल्याने यशस्वी झाली. आता आपल्याला अधिक कडक संचारबंदीचे पालन करावे लागणार आहे. २१ दिवस घरात राहणे हे मोठे कष्टाचे काम असले तरी त्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये जमावबंदी आणि त्यानंतर सक्तीची बंदी लागू करण्यात आली. राज्य सरकारांनी केलेल्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्या. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि करोनाग्रस्त देशांच्या अनुभवातून आपल्याला शिकले पाहिजे. म्हणूनच प्रत्येक राज्य, जिल्हा, गाव, गल्लीमध्ये स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहन मोदींनी केले.

काही राज्यांमध्ये सक्तीची बंदी लागू केल्यानंतरही लोकांनी रस्त्यांवर, बाजारांमध्ये मोठी गर्दी केली. त्यामुळे करोनाच्या संसर्गाची शक्यता कित्येक पटीने वाढली. हाच संदर्भ घेत मोदी म्हणाले की, करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे समजायला कित्येक दिवस लागतात. त्यामुळे संसर्ग झालेला व्यक्ती तोपर्यंत अनेकांना बाधित करू शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक व्यक्ती शेकडो लोकांना बाधित करू करतो. जगभरात पहिले एक लाख करोनाबाधित होण्यास ६७ दिवस लागले. त्यानंतर आणखी एक लाख बाधित होण्यासाठी अवघे ११ दिवस लागले. दोन लाख संशयितांचे ३ लाख संशयित होण्यासाठी केवळ ४ दिवस लागले. इतक्या प्रचंड वेगाने हा रोग पसरत असून त्याला रोखणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे घरात राहण्याचे महत्त्व ओळखा!

पंतप्रधान म्हणाले..

० तीन आठवडय़ांच्या सक्तीच्या बंदीची आर्थिक किंमत चुकवावी लागेल. पण, प्रत्येक जीव महत्त्वाचा असून तो वाचवण्यास प्राधान्य दिले जात आहे.

० देशातील प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब वाचविण्यास केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासनाचे प्राधान्य असेल.

० विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ लागतो. ही साखळी तोडण्यात आपण अपयशी ठरलो तर आपण २१ वर्षे मागे जाऊ. शिवाय कित्येक कुटुंबांचा बळी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे पूर्णत: विसरा. घरातच राहा. हेच एकमेव काम २१ दिवस करा.

० घरातून बाहेर पडणारे एक पाऊलही करोनासारख्या गंभीर आजाराला घरात आणेल हे लक्षात ठेवा.

० चीन, अमेरिका, इराण, इटलीमध्ये करोना पसरला आणि तिथे परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. तिथे आधुनिक आरोग्य व्यवस्था असूनही हे देश करोनाचा प्रभाव कमी करू शकले नाहीत. मग, भारतासारख्या देशासमोर पर्याय फक्त या देशांच्या अनुभवातून शिकणे हाच उरतो. या देशातील लोक आठवडे-आठवडे घरातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांनी सरकारी आदेशांचे पालन केले. आपल्यालाही याच मार्गाने जावे लागेल.

० पंतप्रधानापासून गावागावांतील रहिवाशांपर्यंत सगळ्यांनाच घराची लक्ष्मणरेषा न ओलांडण्याचा निर्धार करावा लागेल. करोनाचे संक्रमण रोखले पाहिजे. साखळी तोडली पाहिजे. भारत या महत्त्वाच्या टप्प्यातून जात असून तो करोनाचा किती प्रभाव कमी करतो हे आपल्या कृतीतून ठरेल.

० ही वेळ संयम बाळगण्याची आहे. धैर्य व शिस्तीच्या परीक्षेची आहे. सक्तीची बंदी असेपर्यंत लक्ष्मरेषेचे वचन पाळा. रक्षणकर्त्यांचा विचार करा. डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णालयांतील कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्सचे चालक, सफाई कर्मचारी हे सगळेच कठीण परिस्थितीत सेवा करत आहेत.

० अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ांसाठी व्यवस्था केली जात आहे. संकटाकाळ हा गरिबांसाठी कठीण काळ असतो. गरिबांचे कष्ट कमी व्हावे यासाठी नागरी संघटनांही प्रयत्न करत आहेत.

० कळत नकळत अफवा पसरल्या जातात. त्या वेगाने पसरतात. कुठल्याही अफवा आणि अंधविश्वासापासून दूर राहा. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्लय़ाचे पालन करा. या साथीची लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेऊ  नका.

आरोग्य क्षेत्रासाठी १५ हजार कोटी

आरोग्यसुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटना, देशातील संशोधन संस्था, तज्ज्ञांच्या सल्लय़ानुसार सर्व निर्णय घेतले आहेत. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले. वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. करोना रोखण्यासाठी लागणारी सर्वप्रकारची साधनसामुग्री पुरवली जाईल. राज्यांचे प्राधान्य आरोग्य सुविधा हेच असले पाहिजे. खासगी क्षेत्रही पूर्णत: साह्य करत आहे. खासगी प्रयोगशाळा, रुग्णालयांचीही मदत घेतली जात आहे, असे मोदी म्हणाले.

जीवनावश्यक वस्तू मिळतील : पुढील तीन आठवडे सक्तीची बंदी लागू करण्यात आलेली असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने खुली राहतील. भाजीपाला, फळे, मांस, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ तसेच औषधे बाजारातून लोकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.  छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमेही या काळात सुरू राहतील.