देशभरात करोना आणि लॉकडाउनमुळे बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांना मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाची सोय करावी लागत आहे. ओडिशाच्या कटकमधील बिष्णुप्रिया स्वैन या विद्यार्थ्यीनीने करोनाकाळात वडिलांची नोकरी गेल्यानंतर फुड डिलीव्हरीचे काम सुरू केले. करोनाची साथ येण्यापूर्वी बिष्णुप्रियासुद्धा सर्व मुलांप्रमाणे अभ्यास करत होती. करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउमुळे अभ्यास सोडून असे काम करावे लागेल याची कल्पना देखील तिला नव्हती.

बिष्णुप्रिया बनली कुटुंबाचा आधार

कटक येथे राहणारे बिष्णुप्रिया स्वैनचे वडील ड्रायव्हरचे काम करत होते. परंतु करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अचानक त्यांची नोकरी गेली. यानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. बिष्णुप्रियाच्या कुटुंबाने जमा केलेली रक्कम संपत आली होती. अशा परिस्थिती बिष्णुप्रियाने कुटुंबाचा आधार बनण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने शिक्षण बाजूला ठेवून काम शोधण्यास सुरुवात केली.

 

बिष्णुप्रियाने झोमॅटोच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्जदेखील केला. मुलाखतीनंतर तिची निवड झाली. बिष्णुप्रिया या कामासाठी आधी बाईक चालवायला देखील शिकली. गेल्या १८ दिवसांपासून ती फुड डिलिव्हरीचे काम चोखपणे पार पाडत आहे. झोमॅटोमध्ये फुड डिलिव्हरी करणारी ती कटक शहरातील पहिली मुलगी आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत हे काम करत असल्याचे बिष्णुप्रियाने सांगितले. त्याआधी सकाळी ६ ते १० पर्यंत ती शेजारच्या मुलांना शिक्षणदेखील देते.

बिष्णुप्रियाने सांगितले की, “लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिकवणी घेत होती. करोना दरम्यान विद्यार्थी वर्गात येत नव्हते. वडिलांची नोकरी गमावल्यानंतर आपल्याला आर्थिक त्रास सहन करावा लागत होता,” असे तिने सांगितले. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी झोमॅटोमध्ये काम करत असल्याचे तिने सांगितले. बिष्णुप्रियाला आणखी दोन लहान बहिणी आहेत. त्यांचे शिक्षण अद्याप सुरू आहे.

आई-वडिलांना बिष्णुप्रियाचा वाटतो अभिमान

बिष्णुप्रिया स्वैनच्या आई-वडिलांनी सांगितले की त्यांना मुलगा नाही पण त्यांच्या मुलगी मुलापेक्षा कमी नाही. बिष्णुप्रिया ही खूप कष्टकरी मुलगी आहे. तिला जेव्हा जेव्हा फुड डिलिव्हरीच्या कामातून वेळ मिळतो तेव्हा ती तिचा अभ्यास करते,” असे तिच्या पालकांनी सांगितले.