करोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाउननंतरही कायम आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. करोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाउन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाउन लागू केला होता.

मागील एका आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाउन लागू केलेला आहे. या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.

एका आठवड्यांनी लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. ‘ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि रुग्णालये यांना प्रत्येक दोन तासांनंतरची अद्ययावत (अपडेट) माहिती मिळावी यासाठी दिल्ली सरकारने पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनास सुसूत्रता येईल,’ अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

“दिल्लीत करोनाचा कहर सुरू असून, त्यामुळे ६ दिवसांचा लॉकडाउन लागू केला होता. आता लॉकडाउन पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ही दरात घसरण झाली असून, दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवताना दिसत आहे,” असंही केजरीवाल म्हणाले.