महाराष्ट्रासोबतच इतरही अनेक राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाउन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

“लोकांनी घाबरून जाऊ नये”

दरम्यान, लॉकडाउन लागू करण्यात आला असला, तरी लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन गोवा सरकारकडून करण्यात आलं आहे. “लोकांनी घाबरण्याचं कारण नाही. सर्व किराणा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. माझं स्थलांतरीत मजूरांना देखील आवाहन आहे की त्यांनी राज्य सोडून जाऊ नये”, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. “जर पुढचे काही दिवस लोकं घराबाहेर पडले नाहीत, तर आपण करोनाची साखळी तोडण्याच यशस्वी ठरू”, असं देखील ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत नियम?

गोव्यात पर्यटकांची पसंती असते ती कसिनो, बारला. मात्र, लॉकडाउनदरम्यान गोव्यातील सर्व कसिनो आणि बार बंद राहणार आहेत. शिवाय, फक्त होम डिलीव्हरीसाठी रेस्टॉरंटचं किचन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जेवण्यास बंदी असेल. राज्यात कुठेही अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारांसाठी किंवा कामांसाठी बंदी नसेल.

पर्यटकांना हॉटेलबाहेर पडण्याची बंदी!

दरम्यान, गोव्यात आत्ता असलेल्या पर्यटकांना त्यांच्या हॉटेलबाहेर पडण्यापासून मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून सोमवार ३ मे रोजी सकाळपर्यंत पर्यटकांना आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, गोव्यातील अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर होण्याची देखील शक्यता आहे. याआधीच कलंगुट आणि कँडोलिम या परिसरातल्या काही भागात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत.

Corona: १५० जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाउन?; आरोग्य मंत्रालयाने मांडला प्रस्ताव


दरम्यान, गोव्यात सध्या ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नसून जितकी गरज आहे, तेवढा ऑक्सिजन पुरवला जात आहे, असं देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांना करोनाची लक्षणं दिसत आहेत, त्यांनी चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा न करता तातडीने उपचारांना सुरुवात करावी, असं देखील आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केलं आहे.