सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत २१ दिवसांचं लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. अशा परिस्थितीत ठरविक वेळेसाठी बाहेर जाऊन लोकं अन्नधान्याची खरेदीही करताना दिसत आहे. परंतु या लॉकडाउनचा वापर काही जण संधी म्हणून करत आहेत. अशीच एक घटना घडली गुजरातमधील अहमदाबाद शहरात. अहमदाबादमध्ये पोलिसांनी बटाट्याची पोती चोरणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हे दोघं बाटाट्याच्या गोण्या चोरून त्या चढ्या भावानं विकण्याच्या हेतूनं आले होते.

एपीएमसी मार्केटमध्ये ही घटना घडली. एका दुकानावर काम करणाऱ्या एका व्यक्तीकडे दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी आपल्या मालकाला दोन गोण्या बटाटे हवं असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्ती दोन गोण्या घेऊन गेले. काही वेळानं पुन्हा त्या व्यक्ती आल्या आणि बटाट्याच्या गोण्या नेऊ लागल्या. त्यावेळी दुकानातील व्यक्तीला संशय आला आणि त्यांची त्या दोघांशी बाचाबाची झाली, अशी माहिती वेजलपूर पोलिसांकडून देण्यात आली. अहमदाबाद मिररनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे

दोघांशी झालेल्या बचाबाचीनंतर दुकानातील व्यक्तीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. आशिक मलिक आणि अशरफ खान पठाण असं या आरोपींची नावं आहेत. बटाट्याच्या गोण्या चोरून बटाटा चढ्या दरानं विकण्याचा त्यांचा हेतू होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची रिक्षाही जप्त केली आहे. तसंच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.