देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. त्यानंतर केंद्र सरकार लॉकडाउन वाढवणार की हटवणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाउनच्या निर्णयाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी रात्री चर्चा केली. या चर्चेत राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबर लॉकडाउनबद्दल सल्लामसलत केली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन आणखी १५ दिवसांनी वाढवायला हवा,” असा सल्ला शाह यांना दिला आहे.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये करोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मजूर स्वगृही परतल्यानं बिहारमधील करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच देशात लागू असलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याची मुदत दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी गुरूवारी रात्री फोनवरून संवाद साधला होता.

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवण्याची सल्ला दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सावंत म्हणाले, “अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवायला हवा, असं सांगितलं. यात काही गोष्टी गोष्टी सुरु करण्यास मूभा द्यावी. ५० टक्के क्षमतेनं आणि सोशल डिस्टसिंग पाळून हॉटेल सुरू करायला हवी. त्याचबरोबर व्यायामशाळा (जिम) सुरू व्हाव्यात अशी अनेक लोकांची मागणी आहे. करोना रुग्ण संख्येचा आकडा कमी करण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन अतिशय गरजेचा आहे,” असं सावंत यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेली ठिकाण तसेच एक जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत, यासंबंधी माहिती आढावा घेतला, असं पीटीआयनं अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. लॉकडाउनसंदर्भात अमित शाह यांनी पहिल्यांदाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे.