बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नेत्यांची फोडाफोडी सुरू असताना दुसरीकडे करोना परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. राज्यातील एकूण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनं राज्यातील लॉकडाउन ६ सप्टेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. जदयू आणि राजदने एकमेकांना धक्के देणं सुरू केलं आहे. तर दुसरीकडे बिहारमधील करोना परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा झाल्याचं दिसत नाही. बिहारमधील करोनाची रुग्णसंख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. बिहारमध्ये ४६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२ हजार रुग्ण बरे झाले असून, ३१ रुग्ण सध्या उपचार घेत आहे. मात्र, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारनं राज्यातील लॉकडाउनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार आहे.

आणखी वाचा- चिंताजनक! भारत बनला करोना उद्रेकाचा जागतिक केंद्रबिंदू

आणखी वाचा- भारतात मागच्या २४ तासात दर तीन मिनिटात करोनामुळे दोघांचा मृत्यू

लॉकडाउन शिथिल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात बिहारमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. त्यानंतर हळूहळू राज्यातील रुग्णांचा आकडा वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नितीश कुमार यांच्या सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. सध्या बिहारमध्ये रात्री १० ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाजारपेठा आणि दुकानांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. बिहार सरकारनं अद्यापही मॉल्स आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. हॉटेल व्यावसायिकांना होम डिलिव्हरी देण्यास मूभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे.