करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये नाइट कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी शाळा, कॉलेज आणि कोचिंगसारख्या शैक्षणिक संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> “करोनामुळे २०२० चं शैक्षणिक वर्ष वाया गेलं”; ‘या’ देशात सरकारनेच केली घोषणा, थेट २०२१ मध्ये उघडणार शाळा

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांमध्ये योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचींग क्लासेस आणि चित्रपटगृहे ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

महिन्याभरापूर्वीच  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये १६ मार्चपासून देशभरामध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार असल्याचे संकेत दिले होते. या मुलाखतीमध्ये शाळा आणि महाविद्यालये १५ ऑगस्टनंतर सुरु होणार असं म्हणता येईल का असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता निशंक यांनी ‘अर्थात’ असं उत्तर दिलं होतं. सुरुवातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील शाळा सुरु होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले जातील अशा चर्चा सुरु असतानाच निशंक यांनी या चर्चांना पूर्वविराम दिला होता. निशंक यांनी व्यक्त केलेल्या शक्यता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आजच्या पत्रकामुळे खरी ठरली आहे.

नक्की वाचा >> Viral Video: लॉकडाउनदरम्यान पोराचं वजन वाढलं, शाळेचा गणवेश घालताना पालकांची उडाली तारांबळ

आठ जूनपासून हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळे टप्प्याटप्प्यांमध्ये सुरु करण्यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आणि त्या अंमलातही आणल्या आहेत. असं असतानाच देशातील ३३ कोटी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मात्र शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार यासंदर्भात अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत. रोज नवीन नवीन बातम्या समोर येत असल्याने पालकांबरोबरच आता विद्यार्थ्यांची चिंताही वाढू लागल्याचे दिसत आहे.